अध्यक्षांचे मनोगत

श्री. प्रशांत दामले
अध्यक्ष

नमस्कार,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्षपद मिळणे ही माझ्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट मी समजतो.

अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मी सगळा आढावा घेतला आणि काय काय गोष्टी करायला पाहिजेत , आपण कुठे कमी पडतो ह्याचा विचार केला. पहिली गोष्ट ठरवली म्हणजे मागच्या कार्यकारिणीने काय केले ते काही काढायचे नाही. त्यामुळे सकारात्मक विचार करता येतो.

पहिली गोष्ट करायची ठरवली म्हणजे आपल्या सगळ्या शाखा सक्षम करणे. त्यासाठी त्यांना काही कार्यक्रम देणे आवश्यक होते. त्यानुसार एकांकिका स्पर्धा घेण्याचा कार्यक्रम जाहीर केला. आणि ह्या स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. शाखा सक्षम करणे म्हणजे नुसते कार्यक्रम नाही, तर ज्या शाखा कार्यरत आहेत आणि अगदी जोमाने काम करत आहेत त्या आर्थिक दृष्ट्या सुद्धा कश्या सक्षम होतील ह्या दृष्टीने सुद्धा नियोजन चालू आहे.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक रंगकर्मी काम मिळवण्यासाठी मुंबईत येतात , त्यांच्या ह्या स्ट्रगल च्या काळात त्यांची किमान सहा महीने तरी सवलतीच्या दरात राहण्याची सोय कशी करता येईल, ह्याचा विचार चालू आहे. कारण मुंबईत आल्यावर राहण्यासाठीच भरपूर पैसे खर्च होतात. तिसरी गोष्ट म्हणजे आपले हे जे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल आहे त्याचा रंगकर्मीना अधिक वापर कसं करता येईल, ह्याचा विचार करणे. म्हणजेच बाल नाट्य , प्रयोगिक नाटके आणि इतर नाट्य विषयक कार्यक्रमाना जागा उपलब्ध करून देणे. चौथी गोष्ट म्हणजे रंगमंच कामगारांसाठी काही विशेष योजना राबवता येईल का ? काही वर्षापूर्वी अशी योजना होती, पण काही कारणाने ती बंद पडली, त्यामागे काय कारण होते , त्याची माहिती घेऊन नवीन योजना तयार करणे. असा विचार चालू आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर घेऊन जाणे असा प्रयत्न करायचा आहे. दही हंडीच्या वेळी गोविंदांचे एकावर एक थर असतात, पण सगळ्यात खालचा थर भक्कम असावा लागतो. तसेच आपल्या कार्यरत शाखा हा आपला भक्कम खालचा थर आहे. त्या आधारानेच आपल्याला नाट्य परिषदेला अखिल भारतीय स्तरावर घेऊन जायचे आहे.

नाट्य संमेलन हा एक भाग झाला. ह्याशिवायही अनेक गोष्टी करण्याचे ठरवले आहे. व्यावसायिक नाटकाना काही मदत करता येईल का ह्याचाही विचार चालू आहे. उदाहरणार्थ , नाटकांच्या गाड्यांचा टोल कमी करता येईल का, नाट्यगृहाचे विजेचे बिल कमी करता येईल का, महाराष्ट्राटली सर्व नाट्यगृहे द्यायवत करता येतील का, ह्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत, अश्या अनेक गोष्टी नाट्य परिषदेने करण्याची गरज आहे.

धन्यवाद